- अतुल जयस्वालअकोला : गणेश मंडळांवर वीज देयकाचा भूर्दंड वाढू नये, यासाठी महावितरणने सवलतीच्या दरात वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याची योजना सुरु केली आहे. गणेश मंडळांनी या योजनेचा लाभ घेऊन अधिकृत वीज जोडणी घ्यावी, तसेच सुरक्षा उपायांचे पालन करून विघ्नहर्त्याच्या उत्सवात वीज अपघाताचे विघ्न टाळावे, असे आवाहन महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी केलेल्या खास बातचित दरम्यान केले.प्रश्न : गणेश मंडळांना वीज पुरवठ्यासाठी महावितरणने काय व्यवस्था केली आहे?डॉ. केळे : गणेश मंडळांना सवलतीच्या दरात अधिकृतपणे वीज पुरवठा घेता यावा, यासाठी महावितरणच्यावतीने दरवर्षी योजना अंमलात आणली जाते. या योजनेअंतर्गत गणेश मंडळांना सामान्य वीज दराच्या निम्मे म्हणजे ४ रुपये ३८ पैसे दराने वीज बिल आकारले जाते. एवढेच नव्हे, तर गणेश मंडळांसाठी महावितरणच्या कार्यालयात ‘एक खिडकी’ योजनाही सुरु करण्यात येते.प्रश्न : आतापर्यंत किती मंडळांनी अधिकृत वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत?डॉ. केळे : महावितरणने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी गणेश मंडळांकडून बुधवार दूपारपर्यंत तरी पुरेसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील नोंदणीकृत मंडळांपैकी केवळ ३१ मंडळांचे अर्ज आले आहेत.प्रश्न : सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत ?डॉ. केळे : गणेश उत्सवादरम्यान अधिकृत तंत्रज्ञाकडून वीज जोडणी करून घेतल्यास अपघाताची शक्यता कमी असते. सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणकडून तयारी करण्यात आली आहे. अलिकडेच विद्युत निरीक्षकांची बैठक घेण्यात आली असून, विद्युत निरीक्षक गणेश मंडळांना भेट देऊन सुरक्षा उपायांची पाहणी करतील.प्रश्न. वीज अपघात होऊ नये म्हणून काय संदेश द्याल?डॉ. केळे : गणेशोत्सव हा मांगल्याचा उत्सव आहे. विघ्नहर्त्याच्या या उत्सवात वीज अपघाताचे विघ्न येऊ नये, यासाठी अधिकृत वीज जोडणी घेऊन, अधिकृत तंत्रज्ञाकडून जोडणी करून घ्यावी. सुरक्षा उपायांकडे लक्ष दिल्यास वीज अपघात होणार नाही.