संजय खांडेकरअकोला : आॅर्थरायटीस (संधिवात) संदर्भात समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात अशास्त्रीय आणि अघोरी उपचार केले जातात. रोगाच्या उत्पत्तीकडे लक्ष न दिल्याने रोग आटोक्यात न येता वाढत जातो. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक आहे, असे मत अकोल्यातील आॅर्थरायटीस तज्ज्ञ डॉक्टर संजय शिंदे यांनी व्यक्त केले. शुक्रवार, १२ आॅक्टोबर रोजी असलेल्या जागतिक आॅर्थरायटीस दिनानिमित्त डॉ. शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला विशेष संवाद.प्रश्न : आॅर्थरायटीस म्हणजे नेमके काय?उत्तर : विविध प्रकारच्या सांध्यांचे आणि मणक्यांचे विकार आणि त्यापासून उद्भवणाऱ्या रोगांना आॅर्थरायटीस म्हटले जाते. शरीररचनेतील सांध्यांची संरचना बिघडल्याने हा रोग होतो. अपघाती हाड मोडल्याने, वाढत्या वयात हाडांची झीज झाल्याने, आॅर्थरायटीस होतो. वयाच्या चाळिशीनंतर गुडघ्यांची झालेली झीज, वाढत्या वजनामुळे आलेला दबाव आल्यामुळेही रोग होऊ शकतो.प्रश्न : आॅर्थरायटीस कशामुळे होतो, त्याचे प्रकार किती?उत्तर : आॅर्थरायटीस म्हणजे संधिवात. ५० पेक्षाही जास्त प्रकारचे संधिवात आढळून आले आहेत. संधिवात अनेकदा आनुवंशिक आढळतो. शरीररचनेतील नैसर्गिक सांध्यांचा उपयोग चुकीच्या पद्धतीने केल्यास रोग वाढतो. हाडांमधील ढिसूळता, आतड्यातील काही रोग आणि एखाद्या संसर्गजन्य रोगामुळे विविध प्रकारचे वात उद्भवतात.प्रश्न : आॅर्थरायटीसची लक्षणे आणि अद्ययावत उपचार पद्धती कोणत्या?उत्तर : शरीरसंरचनेच्या हाडांच्या जाइंटमध्ये दुखणे, जॉइंट लॉक होणे, सुजन येणे, पाणी भरणे, हाडांचा आकार बदलत जाणे ही प्राथमिक आॅर्थरायटीसची लक्षणे आहेत. संधिवातावर अनेक वैद्यकीय पॅथीतून उपचार केले जातात. अॅलोपॅथीमध्ये औषधोपचारापासून तर शस्त्रक्रियापर्यंत उपचार केले जातात.प्रश्न : आॅर्थरायटीसच्या निदानासाठी कोणत्या तपासण्या गरजेच्या आहेत?उत्तर : जर उपरोक्त लक्षणे दिसत असतील, तर रक्त, एचएलए, युरीक अॅसिड आणि ‘एमआरआय’च्या तपासणीतून आॅर्थरायटीसचे निदान केल्या जाते.प्रश्न : आॅर्थरायटीस होऊ नये, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?उत्तर : आॅर्थरायटीस होऊ नये, यासाठी आहारासोबत स्नायूंचा नियमित व्यायाम आवश्यक आहे. दारू, तंबाखू, सिगारेट-विडीचे सेवन, अतिनॉनव्हेज टाळावे, शरीरसंरचनेतील सांध्यांची नियमित नैसर्गिक पद्धतीने हालचाल होईल, असे व्यायाम करावे, वज्रासन किंवा नमाज अदा करण्यासारखी बैठक जास्त नसावी, उंचीनुसार वजन आटोक्यात ठेवावे, ही काळजी घेतली, तर आॅर्थराटीसपासून आपण दूर राहू शकतो.