माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर कमी करत असतानाच २०१७/१८ मधे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे कर्ज थकीत राहिले होते. अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आली नाही. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असून, अनेक शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामातील विविध पिकावर लावलेला खर्च सुध्दा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. तरी शासनाकडून घोषित केलेली प्रोत्साहनपर मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, असी मागणी नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.
नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राेत्साहन अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:17 AM