लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कृषिपंपाच्या थकबाकीत व्याज, विलंब आकार माफ करून सुधारित थकबाकीत ५० टक्के माफी देणारे महावितरणचे ‘कृषी वीज जोडणी धोरण २०२०’चा जागर अकोला परिमंडळात मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या नेतृत्वात सायकल रॅलीने करण्यात आला. निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते ‘कृषी ऊर्जा पर्व’ पुस्तिकेचे विमोचन करून सायकल रॅलीला सुरूवात करण्यात आली.
विद्युत भवन, अकोला येथून शुक्रवारी निघालेल्या या जागर रॅलीत अकोला जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट, अश्विनी चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पीपरे, वरिष्ठ व्यवस्थापक गणेश भंडारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्युत भवन, जठार पेठ, न्यु तापडीया नगर या मुख्य रस्त्यासह मुख्य चौकातून मार्गक्रमण करत अकोल्यापासून जवळच असलेल्या खरप या गावापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीव्दारे महाकृषी ऊर्जा अभियानात सहभागी होऊन वर्षानुवर्षे असलेल्या थकबाकीच्या ओझ्यातून मुक्त होण्याचा संदेश देण्यात आला. खरप गावात रॅली पोहोचल्यावर मुख्य अभियंता अनिल डोये व अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या उपस्थितीत खरप येथील ५ शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानात सहभागी होऊन आपली थकबाकी शून्य केल्याबद्दल त्यांना थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन मुख्य अभियंता यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी महावितरणच्या कृषी धोरणानुसार ३ शेतकऱ्यांना वीज जोडणीचे जाग्यावरच मागणीपत्र देण्यात आले व एका शेतकऱ्याला मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते तत्काळ वीज जोडणीही देण्यात आली.