- संतोष येलकर
अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी महिलांनी पुढे यावे, याकरिता गॅस सिलिंडरवर स्टिकर लावून स्त्रीशक्ती मतदारांमध्ये जागृती करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे.आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पात्र नवीन मतदारांची नोंदणी, दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करणे, मतदारांचे कृष्णधवल छायाचित्राऐवजी रंगीत छायाचित्र प्राप्त करणे, नावात व पत्त्यात दुरुस्ती इत्यादीसंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व तहसील स्तरावरील मतदार मदत केंद्रांमार्फत मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.मतदार नोंदणी विशेष मोहिमेत जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी महिला शक्तीने सक्रिय सहभाग घेऊन पुढे यावे, याकरिता जिल्ह्यातील गॅस सिलिंडर वितरण केंद्रांमार्फत सिलिंडरवर स्टिकर लावून महिला मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे.
‘स्टिकर’द्वारे मतदार यादीत नाव नोंदणीचा संदेश!मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रमात मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी महिला मतदारांनी पुढे यावे, त्याकरिता गॅस सिलिंडरवर स्टिकर लावून महिला मतदारांमध्ये जागृती केली जात आहे. ‘स्त्री शक्ती देशाची- ताकद लोकशाहीची, महिलांनो पुढे या मतदार यादीत नाव नोंदवा’ असा संदेश देणारे स्टिकर सिलिंडरवर चिटकवून महिला मतदारांमध्ये जागृती केली जात आहे.
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबविण्यात येत असलेल्या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यामध्ये महिला मतदारांमध्ये जागृतीसाठी गॅस सिलिंडरवर स्टिकर लावून मतदार यादीत नाव नोंदविण्याचा संदेश महिला मतदारांना देण्यात येत आहे.-आस्तिककुमार पाण्डेयजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला.