अकोला: रक्तदान दिनानिमित्त व स्वेच्छा व विनामोबदला रक्तदाता सप्ताहांतर्गत शहरातून गुरुवारी मोटारसायकल रॅली काढून रक्तदानाबाबत जागृती करण्यात आली. सकाळी ९ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, विभाग प्रमुख डॉ. दिलीप सराटे व डॉ. देगावकर उपस्थित होते.मोटारसायकल रॅलीमध्ये ब्लड हेल्पलाइनचे सदस्य सहभागी झाले होते. मोटारसायकल रॅली ही शासकीय रक्तपेढी ते पंचायत समिती कार्यालयासमोरून तहसील कार्यालय, कोतवाली चौक, बसस्थानक चौक, गांधी रोडवरून टिळक मार्गाने जिल्हा न्यायालय, तापडिया नगर चौक ते जठारपेठ, जवाहर नगर मार्गे, सिव्हिल लाइन चौक, नेहरू पार्क येथून अशोक वाटिका मार्गाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचली. सिव्हिल लाइन चौकात सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी, तर अशोक वाटिका येथे आकाश हिवराळे यांनी रॅलीचे स्वागत केले. कॉलेज कट्टा येथे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी रॅलीचे स्वागत केले आणि मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. बाळकृष्ण नामधारी यांनी केले. आभार डॉ. अनिकेत काकडे यांनी मानले. यावेळी ब्लड हेल्पलाइनचे आशिष कसले, निशिकांत बडगे यांच्यासह रॅलीत सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी डॉ. आशिष शिंदे, डॉ. श्रेया बढे, डॉ. श्रीराम चोपडे, डॉ. शोभना, डॉ. जसलिन, डॉ. अहिल्या, डॉ. प्रदीप माले, डॉ. पाथरवट श्यामकांत, डॉ. शाहनवाज खान, डॉ. चारुशीला ढाले. डॉ. प्रीती चरखा आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)