अकोला : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणरया जिल्हा परिषदेच्या पाचमोरी येथील शाळेत कोरोना या संसर्गजन्य आजाराबद्दलची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी या अनुषंगाने कोरोना व्हायरस बचाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कोरोनाबाबत जनता व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने शाळेत कोरोना बचाव कार्यशाळेत मुख्याध्यापिका मनिषा शेजोळे यांनी कोरोना व्हायरसविषयी व्हिडीओ क्लिप्स द्वारे विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच प्रतिबंधात्मक उपायांचीही माहिती देण्यात आली. कोरोना आजाराची लक्षणे मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित असतात. या विषाणूचा हवेतून प्रसार होत नसून, लागण विशेषत: डोळे, नाक व तोंडाद्वारे होते म्हणून वैयक्तिक स्वच्छतेसोबतच मास्क, रूमालचा वापर नियमित करावा, जेणेकरून कोरोनापासून बचाव होईल, यादृष्टीने कागदी बचाव मास्कची निर्मिती त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली. कोरोना आजारासोबतच इतर आजारांपासून बचाव व्हावा, विद्यार्थ्यांना लक्षणे व उपाययोजनांची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेतून आरोग्यदायी सवयींची रूजवणूक करण्यात आली. तसेच लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे वागू नये, उपचारासाठी आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना विषाणूबद्दल काळजी करू नका, सावध रहा, अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वत:ला व इतरांना सुरक्षित ठेवा असे शिक्षिका सुरेखा पागृत यांनी सांगितले. त्यानंतर कोरोना आजार लक्षणे व उपाययोजनाच्या माहितीपत्रकांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. कार्यशाळेला ज्येष्ठ नागरिक उज्वला जोशी, जनाबाई गवई, उपाध्यक्षा बबिता खंडारे, शशिकला घुमसे, पालक प्रतिनिधी बोदडे उपस्थित होते.
विद्यार्थी व पालकांमध्ये ‘कोरोना’ विषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 1:11 PM