- संतोष येलकर
अकोला : येत्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यामध्ये पिकांची पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
पीकनिहाय पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुकांमुळे पिकांची उत्पादकता कमी येते. या पार्श्वभूमीवर येत्या खरीप हंगामात पिकांची पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुका टाळणे आणि पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये घरगुती बियाण्याचा वापर करताना उगवण क्षमता व बीज प्रक्रिया न करणे, ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना योग्य अंतरावर व योग्य खोलीवर पेरणी न करणे, शिफारशीनुसार बियाण्याची मात्रा न वापरता जास्तीची मात्रा वापरणे, पेरणी यंत्राने किंवा सरी व वरंबा पद्धतीने पेरणी न करणे, सोयाबीन पिकासाठी गंधकाची आवश्यकता असताना त्याचा वापर न करणे, अनुभव नसलेल्या ट्रॅक्टरचालकाकडून पेरणी यंत्राद्वारे पेरणी करून घेणे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर न करता अनाठायी कीटकनाशकांच्या फवारण्या करणे, आदी प्रकारच्या चुका टाळणे आणि पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. गावनिहाय बैठकांमध्ये संबंधित कृषी सहायकांकडून यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
खरीप हंगामात पीकनिहाय पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुका टाळणे व पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या उपाययोजना करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ एप्रिलपासून गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार असून, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- शंकर तोटावार, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.