संतोष येलकर
अकोला : येत्या खरीप हंगामात सोयाबीन पीक उत्पादनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी घ्यावयाच्या काळजी संदर्भात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. त्यामध्ये विभागातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि कृषी निविष्ठांच्या दुकानांमध्ये भिंतीपत्रके लावण्यात येणार असून, त्याद्वारे सोयाबीनचा उत्पादन खर्च कमी करण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
खरीप हंगामात सोयाबीन पेरणीसाठी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक इत्यादी निविष्ठांसाठी होणारा खर्च कमी करुन सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यामध्ये सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर होणारा खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात गावागावात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. सोयाबीन उत्पादनासाठी निविष्ठांवर होणारा खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात पाचही जिल्ह्यांत ग्रामपंचायती आणि कृषी निविष्ठांच्या दुकानांमध्ये भिंतिपत्रके लावण्यात येणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोहोचविण्यात येणार आहे.
‘या’ मुद्द्यांवर करण्यात येत आहे
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती!
सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी कृषी निविष्ठांचा खर्च कमी करण्यासाठी पेरणीकरिता घरचे बियाणे वापरणे, बीज प्रक्रिया करुन जैविक पद्धतीने बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, खतासोबत गंधकाचा वापर करणे, ५ सेंटीमीटर खोलीपर्यंत सोयाबीनची पेरणी करणे इत्यादी मुद्द्यांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
येत्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीवर होणारा कृषी निविष्ठांचा खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात अमरावती विभागातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व कृषी निविष्ठांच्या दुकानांमध्ये भिंतीपत्रके लावण्यात येणार आहेत.
शंकर तोटावार
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग