अकोला : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मंगळवारी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पुणे येथील अपर जिल्हाधिकारी यू.ए. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शासन आदेशानुसार २१ जानेवारी रोजी राज्यातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वर्षभरापूर्वीच अकोला जिल्हा परिषदेत ‘सीईओ’ म्हणून रुजू झाल्यानंतर आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची गतीने अंमलबजावणी करण्यासह वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवून वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत प्रशासक म्हणूनही त्यांनी कारभार सांभाळला. सदैव कार्यतत्पर राहून प्रशासकीय कामकाज गतीने करण्यासह नागरिकांच्या समस्यांचे निवारण आणि उपाययोजनांची कामे करण्यासाठी धडपड करणारा अधिकारी म्हणून प्रसाद यांनी वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. उत्कृष्ट काम करणारा अधिकारी म्हणून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसाद यांच्या कार्य-कौशल्याचे कौतुक केले आहे. सीईओ-प्रशासक म्हणून काम करताना त्यांचे कुणाशीही खटके उडाले नाही. सर्व संबंधितांसोबत समन्वय ठेवून काम करणाºया आयुष प्रसाद यांना सर्वांचेच सहकार्य मिळाले. पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गत आठवड्यात पहिल्यांदाच घेतलेल्या आढावा बैठकीत प्रसाद यांच्या कार्य-कौशल्याचे कौतुक केले होते.
आयुष प्रसाद यांची पुण्याला बदली; जाधव नवे ‘सीईओ’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:08 PM