लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबातील ४ लाख १५ हजार १७५ लाभार्थ्यांना निवडक, गंभीर १३०० आजारांवर ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहे. दरम्यान, २७ फेब्रूवारीपर्यंत १ लाख ३० हजार लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’चे वितरण करण्यात आले असून अद्याप २ लाख ८५ हजार १७५ लाभार्थी यापासून वंचित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी पात्र लाभार्थींनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व इतर खासगी रुग्णालयांमधील आरोग्य मित्रांना भेटून नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १ लाख ३० हजार लाभार्थींनाच गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी १२ हजार ९६८ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र ४ लाख १५ हजार १७५ लाभार्थींना गोल्डन कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र गोल्डन कार्ड नसल्याने उपचारापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. पात्र असणाऱ्या कुटुंबांनी तातडीने या योजनेत नोंदणी करण्यासाठी आपल्या परिसरातील आपले सरकार सेवा केंद्र अथवा योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी केले आहे.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत पात्र लाभार्थींनी आपले सरकार सेवा केंद्र अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांना भेटून नोंदणी करावी व विनाविलंब गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम