अकोला: जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बी. वैष्णवी सोमवारी अकोला जिल्हा परिषदेत रुजू झाल्या असून, त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) पदाची सुत्रे स्वीकारली.शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची अमरावती येथे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भंडारा जिल्हयातील तुमसर उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी बी.वैष्णवी आल्या आहेत. त्यानुसार सोमवार २४ जुलै रोजी अकोला जिल्हा परिषदेत रुजू होत, बी.वैष्णवी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सुत्रे स्वीकारली आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०१९ मधील तुकडीच्या त्या सनदी अधिकारी असून, सर्वप्रथम त्रिपुरामधील अंबासा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यानंतर राज्यातील भंडारा जिल्हयात तुमसर येथे उपविभागीय अधिकारी व सहायक जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली असून, २१ जुलै रोजीच्या शासन आदेशानुसार अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बी.वैष्णवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गतीमान प्रशासनातून ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य
जिल्हा परिषद प्रशासनात आवश्यकतेनुसार कार्यशैलीत बदल करुन, गतीमान प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हयातील ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांनी ‘सीइओ’ पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखून कामकाज करण्यात येणार असल्याचेही बी.वैष्णवी यांनी स्पष्ट केले.