अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत हिवाळी-२०१८ चा बी.ए. द्वितीय सत्र तीनचा निकाल सोमवार, २५ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला; पण परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणपत्रिकाच दिसत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. अशातच तांत्रिक अडचणींमुळे निकालाच्या मूळ गुणपत्रिका वीस दिवसांच्या आत दिल्या जाणार असल्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची बी.ए. द्वितीय सत्र तीनच्या हिवाळी २०१८ परीक्षेचा निकाल २५ फेब्रुवारी रोजी लागला. आॅनलाइन निकालामध्ये जे विद्यार्थी नापास झालेत त्यांचा निकालच दाखवण्यात आला नाही. शिवाय, त्यांचे आसन क्रमांकही दाखविण्यात आले नाही. निकाल न लागल्याने या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. शिवाय, महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिकाही पोहोचल्या नाहीत. यासंदर्भात विद्यापीठाने सर्वच संलग्नित महाविद्यालयांशी पत्र व्यवहार करून तांत्रिक अडचणींमुळे येत्या १५ ते २० दिवसांच्या आत मूळ गुणपत्रिका पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.८ मार्चपर्यंत मुदतवाढपरीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसता यावे, या अनुषंगाने परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.गुणपत्रिकेची प्रत संकेतस्थळावरविद्यार्थ्यांना मुळ गुणपत्रिका मिळाली नसली, तरी त्यांना नव्याने परीक्षा अर्ज भरता यावा, तसेच पुनर्मूल्यांकन करता यावे, या उद्देशाने विद्यापीठातर्फे संकेतस्थळावर गुणपत्रिकेची प्रत उपलब्ध करून दिली आहे. परीक्षेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना ही प्रत अर्जासोबत जोडावी लागेल.
या संदर्भात विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्यांना पत्र पाठवून कळविले आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.- डॉ. हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.