अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून सामाजिक संस्था, संघटनांतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. भीम जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
------------------------------------------
चंद्राई व्यसनमुक्ती उपचार, पुनर्वसन केंद्रातर्फे महामानवाची जयंती साजरी
मूर्तिजापूर : तालुक्यातील सिरसो येथील चंद्राई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्रात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष विनोद बावनेर उपस्थित होते. तसेच संस्था सचिव छाया बावनेर उपस्थित होत्या. संस्था प्रकल्प संचालक अपर्णा बोधलकर यांनी "राजा संविधानाचा" या विषयावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेतील कर्मचारी समुपदेशक विजय प्रभे, आशिष मोहोड, अंकुश काळे, कल्पना पवार तसेच गावातील मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय प्रभे यांनी केले, तर आभार अपर्णा बोधलकर यांनी मानले.