लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : माजी मंत्री बाबासाहेब धाबेकरांवर बुधवारी दुपारी १२ वाजता धाबा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता धाबा येथे पसरताच गावात व परिसरात स्मशान शांतता पसरली. गावात दोन दिवसाचा दुखवटा असून, गावातील सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने अंत्यसंस्कार स्थळ व त्याकडे जाणाऱ्या मार्गाची पाहणी केली आहे. राजकारणातील एक प्रखर व्यक्तिमत्त्व असलेल्या बाबासाहेब यांना योजना महर्षी ही उपाधी जनतेने बहाल केली.त्यांची कर्मभूमी असलेले धाबा हे गाव ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून ओळखले जाते. ग्राम पातळीवरून राज्य पातळीवर आपला राजकीय प्रवास करणारे बाबासाहेब हे आता आपल्यामधून कायमचे निघून गेले. त्यांच्या आठवणीने ग्रामस्थांना शोक अनावर झाला. गावातील आबालवृद्ध हे बाबासाहेबांच्या निधनामुळे शोकसागरात बुडाले आहेत.बाबासाहेब धाबेकर यांच्या पार्थिवावर धाबा येथे बुधवारी अंतिम संस्कार होणार असून, राज्यातील अनेक राजकीय नेतेमंडळी, पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार आदींसह हजारो चाहते त्यांच्या अंत्यविधीसाठी धाबा गावी येणार आहेत.अंत्यविधी कार्यक्रमादरम्यान होणाºया गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने बार्शीटाकळी पोलिसांनी व महसूल विभागाने अंत्यविधी स्थळाकडे जाणाºया मार्गाची दुपारी पाहणी करून आढावा घेतला. (वार्ताहर)
बाबासाहेब धाबेकरांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 10:13 AM