अकोट : धावत्या बसमध्ये एका गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी अकोट ते यवतमाळ या बसमध्ये धानोरा गुरजजवळ घडली. बसचे चालक आणि वाहक यांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती चांगली आहे.अकोटवरून यवतमाळकरिता एमएच १४ बीटी ४३६१ बस रवाना झाली होती. अमरावती येथून ही बस निघाली असता यामध्ये यवतमाळ येथे जाण्यासाठी रुपाली मोहोकार या बसल्या होत्या. धानोरा गुरव थांब्याजवळ बस पोहोचली असता, महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून चालक व्ही.ए. इंगळे आणि वाहक ए.के. जाधव यांनी समयसुचकता दाखवत बस रस्त्याच्या बाजूला थांबवली, तसेच बसमधील महिला प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसूती बसमध्येच होऊन कन्यारत्न जन्माला आले. प्रसूती झाल्याबरोबर कर्तव्यावरील चालक-वाहकांनी महिला व तिच्या बाळाला थेट नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय रुग्णालयात नेली. तेथे आई व बाळाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. आई व नवजात बाळ दोन्हीही सुखरुप आहे व दोघांची प्रकृती चांगली आहे. अकोट आगारातील कर्तव्यावर असलेले चालक व्ही. ए. इंगळे व वाहक ए. के. जाधव यांनी दाखविलेली समयसुचकता व कर्तव्यनिष्ठतेमुळे दोघांचेही कौतुक होत आहे. ही बस यवतमाळ बसस्थानकावर पोहोचताच यवतमाळ आगाराचे आगार व्यवस्थापक रमेश उईके यांच्या हस्ते इंगळे व जाधव यांचा सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
अकोट आगाराच्या धावत्या बसमध्ये झाला बाळाचा जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:00 AM