अकाेला : रस्तेकामात अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने दाखल केलेल्या प्रकरणात राज्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर कडू यांनी अटकपूर्व जामिनासाठी अकाेल्याच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यांच्या अंतरिम जामिनावर ९ मे राेजी सुनावणी हाेणार असली तरी या आराेपांनी व्यथित झालेल्या ना. कडू यांनी साेमवारी आत्मक्लेश आंदाेलन करून भरउन्हात श्रमदान केले.
जुन्या शहरातील अकोल्यातील बांधकाम सुरू असलेला कॅनॉल रोड संत गोराेबाकाका मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी दुपारी श्रमदान केेले. ना. कडूंनी डोक्यावरून थेट गिट्टी, मुरूमाचे टोपले वाहिले. आपल्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्यांविरोधात त्यांनी गांधीगिरीचं हत्यार उपसले. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, महानगराध्यक्ष मनाेज पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, राहुल कराळे, दिनेश सराेदे, दिलीप बाेचे यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. देशमुख यांनी वंचितवर घणाघाती हल्ला केला. बाळापूर तालुक्यातील पाणीपुरवठा याेजनांसाठी जिल्हा परिषदेचा ठरावही न देणारे पुंडकर असा अनियमिततेच्या गाेष्टी करतात. विकासाला विराेध हेच त्यांचे राजकारण असून त्यांचा जिल्हा परिषदेतील नियमबाह्य हस्तक्षेप या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आराेप त्यांनी केला. ना. कडू यांनी त्यांची बाजू मांडत जनतेच्या सेवेसाठी रस्ताकामांना मी प्राधान्य दिले, असे स्पष्ट केले. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार हा चव्हाट्यावर आणू, असा इशाराही त्यांनी दिला.
राजकारणात माझ्यावर आंदाेलनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत, पण एकही गुन्हा अपहाराचा नाही. वंचितचे धर्यवर्धन पुंडकर यांनी खाेटे आराेप करून दिशाभूल केली आहे. हे सिद्ध हाेईलच. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे ज्या रस्त्यांच्या नावावर मला अडकविण्यात आले आहे, त्याचे प्रतीक म्हणून आज श्रमदान केले. सर्व गुन्हे खाेटे आहेत, हे सिद्ध हाेईलच?
- बच्चू कडू, पालकमंत्री अकाेला