अकोला/मुंबई - सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट जेवणाचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर सोमवारी सायंकाळी पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेसची पाहणी केली. यावेळी धान्यसाठ्याच्या पुरवठ्याची चौकशी केली असता आठ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून या प्रकरणाची चौकशी बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच, येथील स्वयंपाक्याचे खोटे उघडे पडल्यानंतर त्यांनी स्वयंपाक्याच्या थेट कानशिलात लगावली.
बच्चू कडू हे सर्वसामान्यांसाठी लढणारे, झडगणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, अनेकदा त्यांचा आक्रमकपणाही मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय. यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी थेट अरेरावी आणि मारहाण केली. आता, तर मेसमधील स्वयंपाक्याच्या कानशिलात लगावली आहे. धान्याचा होणारा पुरवठा आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, यासंदर्भात सावळागोंधळ सुरू असताना संबंधित कर्मचाऱ्याने मूग आणि तूर डाळ मिळून दररोज २३ किलो लागत असल्याचे सांगितले. दरम्यान, हाच प्रश्न पालकमंत्री कडू यांनी स्वयंपाकीला विचारला असता त्यांनी दोन्ही डाळी मिळून आठ ते दहा किलोंचा उपयोग होत असल्याचे सांगितले. स्वयंपाकीला पुन्हा विचारल्यानंतर सांगितलेल्या आकडेवारीत तफावत आढळून आल्यानंतर पालकमंत्री कडू यांनी स्वयंपाकीच्या कानशिलात लगावली.
निलंबनाच्या कारवाईचे आदेश
सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणल्यानंतर सोमवारी सायंकाळी पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेसची झडाझडती घेतली. सर्वप्रथम मेसमध्ये उपलब्ध धान्यसाठ्याची पाहणी केली. यावेळी उपलब्ध धान्यसाठ्याची नोंद कशा पद्धतीने केली जाते, याची पाहणी केली असता आठ महिन्यांच्या धान्य पुरवठ्याच्या नोंदीच झालेल्या नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास जाब विचारला असता त्यांना स्पष्ट सांगता न आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन या प्रकरणावर चौकशी बसविण्याच्या सूचना पालकमंत्री कडू यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांना दिल्या. यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
मागणी महिनाभराची पुरवठा मात्र आठ दिवसांचाच
मेसमधील सावळागोंधळ उघडकीस आल्यानंतर, येथील नोंदवहीमध्ये महिनाभराच्या धान्याची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र, संबंधित पुरवठादाराकडून केवळ आठ दिवसांचेच धान्य पुरविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या प्रकारानंतर संबंधित पुरवठादारावरही चौकशी बसविण्याची निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.