अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (पश्चिम विभाग महिला) बॅडमिंटन स्पर्धेचा समारोप सोमवारी झाला. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ इंदोर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संघांनी विजय मिळविला. हे चारही संघ वेल्लुर (तामिळनाडू) येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेकरिता पात्र ठरलेत.सोमवारी गट अ मधून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, गट ब मधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गट क मधून देवी अहिल्या विद्यापीठ इंदोर आणि गट ड मधून मुंबई विद्यापीठाने प्रथम स्थान मिळविले. या चार संघात साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले. मुंबई विद्यापीठ व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यातील लढत मुंबईने २-१ अशी जिंकली. मुंबईच्या कल्पीता सावंत हिने पुण्याच्या कल्याणी पुंडलिकवर एकेरीच्या सामन्यात २१-१२,२१-१५ ने विजय मिळविला. एकेरीच्या दुसºया सामन्यात मुंबईच्या रिचा आरोलकर ही पुण्याच्या आदिती काळेकडून २१-१६,२१-३ ने पराभूत झाली. दुहेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या कल्पीता सावंत व पूजा देवलकर या जोडीने पुण्याच्या आदिती काळे व रिया जायले यांच्यावर २१-१६,२१-१५ ने विजय मिळविला.मुंबई विद्यापीठाने पुढील सामन्यात देवी अहिल्या विद्यापीठ इंदोरचा पराभव केला. मुंबई विद्यापीठाकडून पहिल्या एकेरीत कल्पिता सावंत हिचा इंदोरच्या अंशु शर्मा हिने २१-१६,१२-२१,२२-२० ने पराभव केला. दुसºया एकेरीच्या सामन्यात मुंबईच्या रिया अरोलकर हिने इंदोरच्या तनिषा मालकरचा १६-२१,२१-१६,२३-२१ असा खेळ करीत लढत १-१ बरोबरीत आणली. दुहेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या पूजा देवलकर व कल्पिता सावंत या जोडीने इंदोरच्या अंशु शर्मा व पलक काकाणी या जोडीचा १९-२१,२१-१९,२१-०९ असा तब्बल एक तास चाललेल्या लढतीत पराभव केला.मुंबई संघाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संघाचा सरळ ३-० असा पराभव करीत लिग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. देवी अहिल्या विद्यापीठ इंदोर विरुद्ध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघातील लढत रात्री उशिरापर्यंत द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रंगलेली होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकने चतुर्थ क्रमांक मिळविला. स्पर्धेची तांत्रिक बाजू अकोला जिल्हा बॅडमिंटन संघटनेने सांभाळली. डॉ.व्ही.एल.गावंडे, डॉ.आर.जी.देशमुख व चमूने स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.