अकोट उपविभागातील अडगाव खुर्द व बोरवा या गावातून पोलिसांनी १४६ किलो ९०० ग्रॅम गांजा जप्त केला होता. अडगाव खुर्द येथे छापा टाकला असता राजू सोळंके (पांचाळ) याच्या झोपडीतून वारी हनुमान येथील कैलास बाजीराव पवार हा गांजाची विक्री करीत होता. कैलास पवार यास अटक केल्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता कैलास पवारने आपण व बोरवा येथील शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण असे दोघे मिळून गांजाची विक्री करत असल्याचे सांगितले. गांजा कुठून आणला याबाबत विचारपूस केली असता हा गांजा चिचारी येथील प्रफुल्ल उर्फ बाळू गणेश भोपळे याने त्याच्या (एम.एच ३० बी डी २२४६) क्रमांकाच्या ट्रकमध्ये आंध्र प्रदेशातून अकोट विभागात आणल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी प्रफुल्ल भोपळे यास अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली होती. दरम्यान, आरोपीने जामिनाकरिता अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनीष गणोरकार यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला.
आंध्र प्रदेशातून गांजा आणणाऱ्या ट्रक चालक-मालकाचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:17 AM