अकोला : तेल्हारा येथील एका किराणा दुकानाच्या संचालकास क्षुल्लक कारणावरून मारहाण करीत त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या सहा आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. त्यामुळे या आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोचीपुरा येथील रहिवासी भावेश सिसोदिया यांना २१ मे रोजी सायंकाळी ७ वाजता च्या सुमारास मोहसिन शाह जाफर शाह याने उधारीने किराणा मागितला; मात्र उधारी देणार नसल्याचे किराणा दुकानदार भावेश यांनी स्पष्ट केल्यानंतर संतापलेल्या मोहसिन शाह जाफर शाह याने त्याचे साथीदार शाहबाज शाह जाबीर शाह, शब्बीर शाह युसूफ शाह, शाहिद शाह शब्बीर शाह, गुलजामा शाह तय्यब शाह, जाहिद शाह साबीर शाह याना बोलावून किराणा दुकानदार भावेश सिसोदिया यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर भावेश यांच्या कुटुंबीयांनाही मारहाण कय्त त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी भावेश सिसोदिया यांनी तेल्हारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या सहा आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट व भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४७, १४९, २९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी फरार झाले असून त्यांनी विधिज्ञामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्या न्यायालयाने सहाही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ॲड. अजित देशमुख यांनी कामकाज पाहिले.
एका आरोपीस तीन वर्षांचा कारावास
या मारहाण प्रकरणातील एका आरोपीस तेल्हारा येथील एका जुन्या प्रकरणात अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर आरोपी जामिनावर बाहेर असताना त्याने आणखी भावेश सिसोदिया यांनाही मारहाण केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.