अकोला: दूध व्यवसाय हा शेतीपूरक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा व्यवसाय आहे; मात्र या व्यवसायाची मदार ही संतुलित पशुखाद्यावर अवलंबून असल्याने संतुलित पशुखाद्य म्हणजे डेअरी व्यवसायाचा कणा असल्याचे मत बिकानेर येथील राजस्थान पशुवैद्यकीय विद्यापीठचे कुलगुरु प्रा. डॉ. विष्णू शर्मा यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांच्यातर्फे ६ ते ८ आॅक्टोबर २०२० दरम्यान आयोजित ‘बदलत्या काळातील दुधाळ गायीचे पोषण व्यवस्थापन मधील सुधारित तंत्रज्ञान’ विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय आॅनलाइन प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ ए. पी. सोमकुंवर संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता हे होते. उदघाटनपर भाषणात प्रा. डॉ. शर्मा यांनी उपस्थित प्राध्यापक, पशुवैद्यक, विद्यार्थी, डेअरी व्यावसायिक आदी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात उत्तम दर्जाचे संतुलित पशुखाद्य आणि दुधाळ गायीचे आरोग्य व्यवस्थापन यांचा असलेला परस्पर संबंध आणि अर्थशास्त्र विशद केला. संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी प्रा. डॉ. शर्मा, प्रा. डॉ. ए. पी. सोमकुंवर, अधिष्ठाता, प्रा. डॉ. नितिन कुरकुरे, संशोधन संचालक, प्रा. डॉ. विलास आहेर, संचालक विस्तार शिक्षण, करुणानिथी, आलेम्बिक फार्मा. ली. यांचे स्वागत करत प्रशिक्षणाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशनदेखील करण्यात आले. तीन दिवसांच्या प्रशिक्षणात एकूण ११७ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये भारतातील २० राज्यातील १०१ तसेच अमेरिका, कॅनडा, ओमान, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया इत्यादी देशातील १६ प्रशिक्षणार्थ्यांनी लाभ घेतला. डॉ. दिनेश भोसले, डॉ. तिलक धिमन (अमेरिका), डॉ. एम. महेश, डॉ. दयाराम सूर्यवंशी, डॉ. पांडुरंग नेटके (आॅस्ट्रेलिया), डॉ.संतोष शिंदे आणि प्रा. डॉ. अनिल भिकाने आदी व्याख्यात्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी प्रा. डॉ. सुधीर कविटकर, सहयोगी अधिष्ठाता, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. डॉ. कुलदीप देशपांडे, प्रशिक्षण समन्वयक यांनी आभार मानले. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनात डॉ. प्रवीण बनकर, डॉ. महेश इंगवले, डॉ. अतुल ढोक यांनी सह समन्वयक म्हणून परिश्रम घेतले.