बाळापूर: या मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीत शिवसेनेने बाळापूर किल्ला काबिज करून भगवा फडकविला आहे. सेनेचे नितीन देशमुख उर्फ नितीन टाले यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना मात देत, १८ हजार ७८८ मतांनी विजय मिळविला. एमआयएमने मतदारसंघात प्रथमच शिरकाव केल्याने, वंचित बहुजन आघाडीचे तिसऱ्यांदा विजय मिळविण्याचे स्वप्न धुळीत मिळाले.बाळापूर मतदारसंघामध्ये तीनही प्रमुख राजकीय पक्षांनी मराठा उमेदवार रिंगणात उतरवून रंगत निर्माण केली. एमआयएमने वंचितचे बंडखोर डॉ. रहेमान खान यांना रिंगणात उतरवून लढत चौरंगी केली. एमआयएममुळे काँग्रेस-राँका महाआघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे यांना सर्वाधिक फटका बसेल असे चित्र होते. परंतु एमआयएमच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका वंचित बहुजन आघाडीला बसला. एमआयएममुळे मतांचे विभाजन झाल्यामुळे वंचितचे उमेदवार डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना ५0 हजार ५५५ मतांवरच समाधान मानावे लागले. एमआयएमचे उमेदवार डॉ. रहेमान खान यांनी तिसºया क्रमांकाची तब्बल ४४ हजार ५0७ मते घेतली. या मतदार संघात मुस्लिम, दलित मतांचे एमआयएम व वंचित बहुजन आघाडीमध्ये विभाजन झाल्यामुळे सेनेला एकगठ्ठा हिंदू मतांचा लाभ झाला. सुरूवातीला भाजप-सेना, वंचित बहुजन आघाडी आणि महाआघाडीमध्ये तिरंगी लढत दिसत होती. परंतु एमआयएमने राजकीय वातावरण तापवत, ही लढत चौरंगी केली. याचा लाभ थेट भाजप-सेना युतीला झाला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी ६९ हजार ३४३ मते घेतली. देशमुख हे १८ हजार ७८८ मतांनी विजयी झाले. महाआघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे यांना १६ हजार ४९७ मते मिळाली. गावंडे यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार तुकाराम दुधे यांनी ६ हजार २६२ मते घेतली. दुधे यांचे डिपॉझिटही जप्त झाले. बाळापुरच्या किल्ल्यावर प्रथमच भगवा फडकल्याने, भाजप-शिवसेनच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत, विजयाचा जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी बाळापूर शहर दणाणून सोडले. (शहर प्रतिनिधी)
बाळापूर निवडणूक निकाल : बाळापुरच्या किल्ल्यावर फडकला भगवा; युतीचे नितीन देशमुख १८ हजार मतांनी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 5:54 PM