अनंत वानखडे
बाळापूर: तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक खुलेआम सुरू असून, याकडे प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कारवाई होत नसल्याने गौण खनिज माफियांची मुजोरी वाढली असून, लाखोंचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. परिणाम तालुक्याची विकासकामे थांबली आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून वाहतूक सुरू आहे. अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने हा प्रकार वाढला आहे. दरम्यान एखाद्या वाहनावर कारवाई केल्यास राजकीय दबावापोटी वाहन सोडावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांना तटस्थ राहून राजकीय नेत्यांची मर्जी राखावी लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील डोंगरगाव, वाडेगाव येथे अवैध रेतीसाठा जप्त केला होता; मात्र रेतीमाफियांनी रात्रीच्या सुमारास रेतीचे ढीग उचलून नेल्याचे समोर आले आहे. दि. १७ एप्रिल २०२१ रोजी उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याची मागणी केल्याने तलाठ्याने कारवाई करीत उरळ पोलीस स्टेशनमध्ये वाहने जमा केली. पोलीस प्रशासनाने रहदारी वाहतूक कायद्याने दंड वसूल केला. राजकीय दबावापोटी प्रशासन कारवाई करीत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-------------------
भरदिवसात अवैध वाहतूक सुरूच
तालुक्यातील अनेक गावांत घरकूले, बांधकामे, शासकीय कामे सुरू आहेत. त्यासाठी रेती, मुरुम, विटा, माती आदींची विनापरवाना भरदिवसा वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातून दररोज हजारो वाहनांच्या माध्यमातून हजारो ब्रास गौण खनिजाची चोरी होत आहे. महसूल व पोलीस प्रशासन कारवाई करीत नसल्याने गौण खनिजमाफियाची मुजोरी वाढत असल्याचे चित्र आहे.
--------------------------------
कारवाई करण्याची मागणी
तालुक्यातून हजारो ब्रास गौण खनिजाची दररोज खुलेआम चोरी होत असल्याने याकडे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.