वेध पेरणीचे
बाळापूर: तालुक्यात यंदा सोयाबीनसह कपाशी, तूर पिकाचा पेरा वाढणार असून, ज्वारी, मका, मूग, उडीद पिकांचा पेरा घटणार असल्याचे कृषी विभागाच्या माहितीवरुन समजते. सद्यस्थितीत तालुक्यात शेती मशागतीची कामे आटोपली असून, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात जवळपास पाच टक्के पेरणी आटोपल्याची माहिती आहे.
गतवर्षी मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पंधरा दिवस दडी दिल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. यंदा बियाणांचे वाढलेले दर व कमतरता पाहता शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते. दरम्यान, सुरुवातीला चांगला पाऊस बरसल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
-----------------------
५९ हजार ७७३ हेक्टरवर होणार पेरणी
बाळापूर तालुक्यातील अर्धा भाग खारपाणपट्ट्याने व्यापला असून, दहा टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार तालुक्यातील वहिती क्षेत्र ६० हजार ७०८ हेक्टर असून, पेरणी योग्य क्षेत्र ५९ हजार ७७३ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीन २१,२१७ हेक्टर, कपाशी १८,९८० हेक्टर, तूर ८,००७ हेक्टर क्षेत्र, मूग ६,१३० हेक्टर, उडीद ३,७३० हेक्टर, ज्वारी १,४४० हेक्टर, मका १५८ हेक्टर व इतर पिके १११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे.तालुक्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस नसल्याने सात महसूल मंडळातील पडणाऱ्या पावसाचे आकडे वेगवेगळे येत आहे.
-----------------
शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल किमान १०० मि.मी. पाऊस पडल्यावरच पेरणी करावी. बियाणांची कमतरता पाहता दुबार पेरणी बियाणाचे संकट ओढू नये, यासाठी बियाण्याला पेरणीपूर्वी कल्चर लावून पेरणी करावी. तालुक्यात ५ टक्के पेरणी आटोपली आहे.
-नंदकुमार माने, तालुका कृषी अधिकारी, बाळापूर.
-------------------------
शेती मशागतीचे कामे पूर्णत्वास गेली आहेत. पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बी-बियाणांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
-महेश चव्हाण, शेतकरी, कवठा.