लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : प्रवासी वाहनांमध्ये अवैध गुरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून सदर वाहन अडविण्याचा प्रयत्न करणार्या पोलिस उपनिरिक्षक विठ्ठल वाणी यांच्या अंगावर वाहन घालुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री झाला. या घटनेत विठ्ठल वाणी खाली पडल्याने त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.या संदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्तिजापूरकडून दोन प्रवासी वाहनांमध्ये अवैध गुरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून अकोलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांनी २६ डिसेंबरच्या रात्री एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने एक वाहन पकडले. परंतु, दुसर्या वाहन चालकाने पोलिसांना चकवून वाहन वेगाने बाळापूरकडे पळविले. ही माहिती अकोलाच्या पोलीस नियंत्रण कक्षाने बाळापूर पोलिसांना दिली. या माहितीवरून रात्री गस्त घालत असलेले बाळापूरचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी मार्गावर नाकेबंदी करून, भरधाव वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने त्याचे वाहन विठ्ठल वाणी यांच्या अंगावर घातल्याने ते बाजूला खाली पडले. त्यावेळी त्या भरधाव वाहनाचा पाठलाग करून, बाळापूर शहरात पोलिसांनी सदर वाहनाला घेरून पकडले. यामध्ये घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. परप्रांतातून अमरावती मार्गे गुरांची वाहतूक करण्यासाठी अमरावतीमधील मंगेश रमेश वानखडे यांच्या एमएच २२ डी २५५५ क्रमांकाच्या दोन प्रवासी वाहनामध्ये पाच गुरे भरून ती बाळापूरमध्ये पोहोचवण्यासाठी चालक शे. अजीज शे. वजीर (३५) व शे. एहेसान शे. अमन (३३) रा. लाल ताजनगर, अमरावतीवरून रात्री उशिरा निघाले. ही माहिती अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांना मिळाल्याने त्यांनी मंगळवारी रात्री ४ वाजता नाकेबंदीत एक वाहन अकोल्याला पकडले. या कारवाईच्या वेळेस तेथून पळ काढलेल्या वाहनाने बाळापूरजवळ नाकाबंदी करणार्या पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या अंगावर वाहन नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाणी जीव वाचवताना गंभीर जखमी झाले. त्यांनी जखमी अवस्थेतही पळून जाणार्या वाहनाचा पाठलाग सुरू केला असता त्यांचे पोलीस वाहन उलटता-उलटता वाचले. पसार झालेले वाहन बाळापुरात जाताच दोन्ही बाजूने पोलिसांच्या वाहनांनी लाल सवारी परिसरात सदर वाहन पकडले. यामधील पाचही गुरांची सुटका करून उपचारासाठी गोशाळेत पाठविले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. गुरांची अवैध वाहतूक करणारा टाटा सुमो चालक शे. अजीज शे. वजीर व वाहक शे. अहेसान शे. अमन यांना बुधवारी बाळापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत तीन दिवसपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूरचे ठाणेदार विनोद ठाकरे व हे. काँ. शुध्दोधन इंगळे करीत आहेत.
आरोपींवर रोखले पिस्तूलया घटनेतील दोन आरोपीं पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. पोलीस कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने पोलीस उपनिरीक्षक वाणी यांनी शेवटी त्यांच्याजवळील पिस्तूल काढून आरोपीवर रोखून दोन्ही आरोपींसह सदर वाहन बाळापूर पोलीस स्टेशनला आणले व उपरोक्त दोन्ही आरोपींना अटक केली.