अकोला: आर्थिक वर्ष संपत आले असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसून, बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधीही कागदावरच असल्याने, यावर्षीही पूर्णा बॅरेजसह इतर प्रकल्पांच्या कामावर परिणाम होणार आहे.जिल्ह्यात पूर्णा बॅरेज-२, कवठा, शहापूर, नया अंदुरा, उमा, काटेपूर्णा, घुंगशी बॅरेजची कामे अर्धवट असून, मूर्तिजापूर तालुक्यातील वाई संग्रहकाचेही पाच टक्के काम शिल्लक आहे. या प्रकल्पांसाठी लागणारा उपलब्ध नियमित निधी अपुरा असून, अतिरिक्त निधीची गरज आहे. यासाठीचे समायोजन पुढच्या महिन्यात केले जाणार असल्याचे पाटबंधारेच्या सूत्राने सांगितले; पण पुढच्या महिन्यात झाल्यास एक महिन्यात किती निधी खर्च करणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्य शासनाचा निधी अपुरा पडत असल्याने केंद्र शासनाने बळीराजा जलसंजीवनी योजनेतून विभागासाठी १,४०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. तथापि, यातील एकही पैसा अद्याप मिळाला नसल्याचे चित्र आहे. खारपाणपट्ट्यातील पूर्णा बॅरेजचे काम ९० टक्के झाले असून, यावर्षी जून महिन्यात या बॅरेजमध्ये जलसाठा करण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे; पण या बॅरेजच्या वक्रद्वारासह इतर महत्त्वाची कामे अद्याप झाली नाहीत. त्यामुळे यावर्षी जूनमध्ये पाणी साठवणार कसे, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.रेतीचे दर अद्याप निश्चित झाले नसून, सिमेंटीकरणाचे कामही करायचे आहे. पंप हाउसचे काम कधी होणार, हा प्रश्न आहे. आता पंप हाउसऐवजी नवीनच पंप टाकण्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे पुन्हा या नवीन पंपाचे नकाशे, डिझाइनसाठी दोन, चार वर्षे लागू शकतात. अगोदरच्याच डिझाइनला प्राप्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाला वाºया कराव्या लागल्या. त्यानंतर तीन ते चार वर्षांनंतर हे डिझाइन प्राप्त झाले. याच पंपाचे बांधकाम करण्यासाठी आणखी एक-दोन वर्षे लागण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या सूत्राने व्यक्त केली. खारपाणपट्ट्यातील हे बॅरेज शेतकºयांना दिलासा देणारे तर आहेच, शिवाय यातून अकोलकरांनाही पिण्यासाठी पाणी मिळू शकते, असे सर्व असताना या बॅरेजच्या कामाला पूर्ण निधी का मिळत नाही, असा प्रश्न या भागातील शेतकºयांना पडला आहे.
- खारपाणपट्ट्यात सतत जाणवणारी भीषण दुष्काळी स्थिती बघता या बॅरेजचे काम होणे गरजेचे आहे; परंतु अद्याप या कामाला गती नसून, निधीचीही पूर्तता नसल्याने मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना नुकतेच निवेदन दिले आहे.प्रदीपबाप्पू देशमुख,सचिव,अकोला जिल्हा जलसंघर्ष समिती.