मूर्तिजापूर/माना : जवळपास दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे मूर्तिजापूर-माना रेल्वे स्थानकादरम्यान रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याचा प्रकार सोमवार, १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू होते.
माना परिसरातील ६२७ किलोमीटर असलेल्या हिरपूर गेट जवळ पावसाच्या पाण्याने रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याने आज मोठी जीवित हानी होण्यास टळली. प्राप्त माहितीनुसार मानापासून ६ किमी अंतरावर हिरपूर गेट येथील खंबा नंबर ३५/४६ नंबरच्या अपडाऊन रुळावरील गिट्टी हे पाण्याने वाहून गेल्याची घटना हीरपूरगेट जवळ घडली. सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या व सुपरफास्ट एक्सप्रेस याच रुळावरून धावतात. ही घटना नागरिकास माहित पडल्याने तातडीने रेल्वे रेल्वे प्रशासन हे जागे होऊन तातडीने कामास लागले. जर ही घटना कोणाच्या लक्षात आली नसती तर अनेक जीवित हानी होण्यास वेळ लागला नसता.
या गाड्या शॉर्ट टर्मिनेट
१२१३९ सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस भूसावळ स्थानकावर थांबविण्यात आली.
०११४० मडगाव-नागपूर एक्स्प्रेस अकोला स्थानकावर थांबविण्यात आली.
१२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस बडनेरा स्थानकावरच थांबवून परत अमरावतीला पाठविण्यात आली.
१११२१ भूसावळ-वर्धा एक्स्प्रेस मुर्तीजापूर स्थानकावर थांबवून रद्द करण्यात आली.
या गाड्या वळविल्या
पुरी-सुरत एक्स्प्रेस नरखेड, इटारसी, खंडवा, भूसावळ मार्ग वळविण्यात आली.
बिलासपूर-हापा एक्स्प्रेस नागपूर, इटारसी, खंडवा, भूसावळ मार्गे वळविण्यात आली.
सुरत-मालदाटाऊन एक्स्प्रेस भूसावळ, खंडवा, इटारसी, नागपूर मार्ग वळविण्यात आली.
हिसार-सिकंदाराबाद एक्स्प्रेस अकोला, पूर्णा नांदेड मार्गे वळविण्यात आली.
या गाड्यांच्या वेळेत बदल
१२१४० नागपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस ही नऊ वाजता सुटणारी गाडी रात्री १:१५ वाजता सोडण्यात येईल
१२२९० नागपूर-सीएसएमटी ही २०:४० ला सुटणारी गाडी ००:४० वाजता सोडण्यात येईल