अकोला, दि. १६- बांगलादेशी युवतीचे लैंगिक शोषण करून तिला देह व्यापार करण्यास भाग पाडणार्या आरोपींची जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांनी पुराव्यांअभावी मुक्तता केली. तक्रारकर्त्या युवतीची अनुपस्थिती आणि पोलीस तपासामध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा आरोपींना मिळाला. बांगलादेशी युवतीने ५ मार्च २0१३ रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीमध्ये तिने उमरी परिसरातील श्रीकृष्ण भाकरे, दुर्गा भाकरे, नितीन बाहेती, मंदा जाधव आणि नुर अली ऊर्फ कृष्णा यांनी तिला देह व्यापार करण्यास बाध्य केले आणि इलियास खान, प्रशांत चौधरी यांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचे म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३७६ व पिटानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपींपैकी श्रीकृष्ण भाकरे, मुंबई येथील नुर अली ऊर्फ कृष्णा हे आतापर्यंत कारागृहात होते. पोलिसांनी प्रकरणाचा तपास दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणीदरम्यान प्रकरणामध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या. बांगलादेशी युवतीला हिंदी व मराठी भाषा येत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तिची तक्रार हिंदीमध्ये घेतली. महिला व बालकल्याण समितीने तिचा मराठीमध्ये जबाब नोंदविली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने आरोपींची मुक्तता केली. आरोपींतर्फे अँड. गणेश पाठक, अजित देशपांडे, अँड. दिलदार खान, दीपक काटे, अँड. आशिष देशमुख यांनी बाजू मांडली.
बांगलादेशी युवतीचे लैंगिक शोषण, आरोपी निर्दोष
By admin | Published: March 17, 2017 3:13 AM