अकोला : शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. योजनांच्या माध्यमातून मिळणारी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. त्यासाठी शाळांना विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याचा आग्रह केला जातो; परंतु विद्यार्थ्यांचे शून्य ठेवीवर बँक खाते सुरू ठेवण्यासाठी बँका टाळाटाळ करीत असून, किमान हजार रुपये बॅलन्स विद्यार्थ्यांनी ठेवण्याचा बँकांकडून आग्रह केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती, प्रोत्साहन भत्त्यासारख्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. पहिली ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या शिक्षण विभागाच्यावतीने विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, अपघात विमा योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मोफत गणवेश योजना राबविल्या जातात. पूर्वी शासनाकडून विद्यार्थ्यांना रोख किंवा धनादेशाद्वारे योजनेचा लाभ दिल्या जात होता; परंतु यामध्ये अपहार झाल्याच्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत योजनेची रक्कमच पोहोचत नव्हती, त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून योजना लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचे शिक्षण विभागाला आदेश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळांना विद्यार्थी व त्यांच्या आईच्या नावे संयुक्तरीत्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास सांगितले; परंतु जिल्ह्यातील सर्वच बँका विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यासाठी आणि सुरू ठेवण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. मुख्याध्यापकांसह पालक व विद्यार्थी राष्ट्रीयीकृत बँका, पोस्टामध्ये खाते उघडण्यासाठी जात आहेत; परंतु त्यांना आम्ही झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास सक्षम नसल्याचे बँकांकडून सांगुन विद्यार्थ्यांना पळवून लावल्या जात आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर २0१७ शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याने, मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होते; परंतु बँका झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास नकार देत असल्याने विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. खाते उघडल्याशिवाय शासनाच्या योजनांच्या लाभाची रक्कम आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालक व मुख्याध्यापकांना भेडसावू लागला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे!विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्सवर खाते सुरू ठेवण्यासाठी बँका टाळाटाळ करीत आहेत, तसेच खाते सुरू ठेवण्यासाठी किमान हजार रुपयांचे बॅलन्स ठेवण्याचा आग्रह होत आहे. जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे आणि बँकांना विद्यार्थ्यांचे बँक खाते सुरू ठेवण्यास बजावावे, अशी पालकांकडून मागणी होत आहे. खाते बंद असल्याने शिष्यवृत्ती परतविद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पुरेसे बॅलन्स नसल्यामुळे त्यांचे खाते बंद पडत आहे. खाते बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली शिष्यवृत्ती परत जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी बँक व्यवस्थापकांच्या सभेचे आयोजन करून त्यांना विद्यार्थ्यांचे बँक बंद न करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे; तसेच शाळेचे खाते व्यावसायिक नसल्यामुळे बँक खात्यामधून अकाउंटंट मेंटेनन्स व मिनिमम बॅलन्स चार्जेसच्या नावाखाली बँक खात्यातून पैसे कमी केल्या जातात. त्यावर नियंत्रण घालण्याची मागणीही मुख्याध्यापक संघाने केली. याप्रकरणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती करणार आहोत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून विनंतीचे पत्रसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. - प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी
शून्य ठेवीवर खाते सुरू ठेवण्यास बँकांची टाळाटाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 1:42 AM