अकाेला : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून बैलजाेड्या माेठ्या प्रमाणात चाेरीला जात असून, पाेलीस तपास मात्र शून्य असल्याचे वृत्त ‘लाेकमत’ने प्रकाशीत केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने बैलजाेड्या चाेरणाऱ्या बापलेकाला अटक केली. त्यांनी तब्बल १२ बैलजाेड्या चाेरी केल्याची कबुली दिली असून, हे बैल बाेरगाव मंजू येथील कत्तलखान्यात विक्री केल्याचेही समाेर आले आहे. त्यामुळे पाेलिसांनी या दाेघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बाेरगाव मंजू पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसाे बढे येथील रहिवासी गजानन नरसिंग डाबेराव व त्याचा एक अल्पवयीन मुलगा यांनी बाेरगाव मंजू, एमआयडीसी, आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीत बैलजाेड्या चाेरी केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कसून चाैकशी केल्यानंतर त्याने १२ बैलजाेड्या चाेरी केल्याची कबुली दिली. यामधील नऊ बैलजाेड्या त्याने बाेरगाव मंजू पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून चाेरी केल्या तर दाेन बैलजाेड्या मूर्तिजापूर ग्रामीन पाेलीस स्टेशन आणि एक बैलजाेडी एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून चाेरी केल्याचे समाेर आले. पाेलिसांनी या बैलजाेड्यांची माहिती विचारली असता या बापलेकाने या बैलजाेड्या बाेरगाव मंजू येथील कसाई शेख सद्दाम शेख गणी याला कत्तलीसाठी विकल्याची माहिती आराेपींनी दिली. कसाई शेख सद्दाम याने या १२ बैलजाेड्यांची कत्तल केल्याची माहिती समाेर आली आहे. या बैलजाेड्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशात डाबेराव याने एक एमएच ३० बीएम ५२४६ ही गाडी विकत घेऊन उर्वरित पैसे घराचे बांधकामावर खर्च केल्याचे सांगितले. कसाई शेख सद्दाम शेख गणी यास ताब्यात घेतले असता त्याने बैलांची कत्तल करून त्याचे मास विक्री केल्याची कबुली दिली. या १२ बैलजाेड्यांची किंमत सुमारे दाेन लाख ३३ हजार रुपये असल्याची माहिती आहे. या चाेरट्यांकडून एमएच ३० बीएम ५२४६ किंमत ८० हजार व चार मोबाइल फोन किंमत ३० हजार रुपये, एक लोखंडी टॉमी व कत्तल करणारा आरोपीकडून कत्तलीचे साहित्य पुराव्याकामी जप्त केली आहे. असा एकूण चार लाख ४३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अतुल अरुण सरदार यांनी बैलजाेडी चाेरीची तक्रार दिली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी तपास करताना या चाेरट्यांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शैलेश सपकाळ, राजपाल ठाकूर, गणेश पांडे, नितीन ठाकरे, शंकर डाबेराव, संदीप काटकर, लीलाधर खंडारे, रवि पालीवाल, विशाल मोरे, संदीप तवाडे, रोशन पटले, सुशील खंडारे, सतीश गुप्ता, गीता अवचार, चालक प्रवीण कश्यप,
अनिल राठोड व सायबर सेलचे गोपाल ठोंबरे, नीलेश चाटे व गणेश सोनोने यांनी केली.