लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाच्या समजल्या जाणार्या दसर्याच्या मुहूर्तावर विविध वस्तूंची खरेदी केली जाते. यावर्षी वाहन व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा बाजार तेजीत असल्याचे तर सराफा बाजार ‘जैसे थे’ राहण्याचे संकेत आहेत. दरम्यान, दसर्यानिमित्त बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. सोनेरी दिवस म्हणून ओळख असलेल्या दसर्याला वाहन आणि सोने-चांदी खरेदीचा उत्तम मुहूर्त मानले जाते. गतवर्षी पाऊस बर्यापैकी होता. त्यामुळे सर्वच वस्तूंची बाजारपेठ तेजीत होती. यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्याने गतवर्षीसारखा सराफा बाजार तेजीत नसल्याचा दावा सराफा व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या दसर्याला ४0 टक्के उलाढाल कमी होण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तविला. दुसरीकडे वाहन बाजार व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा बाजार बर्यापैकी तेजीत राहण्याचा अंदाज वाहन विक्रेते व व्यावसायिकांनी वर्तविला. ऐन वेळेवर वाहन खरेदीत व्यत्यय येऊ नये म्हणून एका महिन्यांपूर्वीच ग्राहकांनी वाहनांची ‘बुकिंग’ करून ठेवल्याचे वाहन विक्रेते नकुल हुरकट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दसर्याच्या मुहूर्तावर गाडी घरी नेण्याचे नियोजन अनेकांनी अगोदरच करून ठेवले असल्याने विक्रेत्यांना दसर्याच्या मुहूर्तावर गाडी देणे सोपे होणार आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.
आरटीओ कार्यालय सुरू राहणारदसर्याच्या दिवशी शासकीय कार्यालयांना अधिकृत सुटी असते; मात्र याच दिवशी वाहनांची खरेदी मोठय़ा संख्येने होत असल्याने वाहन नोंदणी सुलभ व्हावी म्हणून शनिवार, ३0 सप्टेंबर रोजी वाशिमचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सुरू राहणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले.