अकोला - पातूर पंचायत समितीमध्ये कनिष्ठ अभियंता पदावर कंत्राटी म्हणून कार्यरत असलेल्या अतुल तिडके याला ३ हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ही लाच मागितली असून, अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी पातूरमध्ये ही कारवाई केली. पातूर पंचायत समिती अंतर्गत कामावर असलेल्या रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी पातूर पंचायत समितीमधील कंत्राटी कनिष्ठ अभियंता अतुल तिडके याने तक्रारकर्त्यास सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ७१ हजार ६५0 व ६६ हजार १९८ रुपयांची मजुरांची दोन देयकं थक ीत असल्याने या देयकांवर स्वाक्षरीसाठी तिडके या अभियंत्याने ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारकर्त्याला लाच देणे योग्य न वाटल्याने त्याने या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता कनिष्ठ अभियंता अतुल तिडके याने ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिडके व तक्रारकर्त्यामध्ये ६ हजार रुपयांची रक्कम दोन टप्प्यात देण्याचे ठरले. यामध्ये पहिल्यांदा ३ हजार व दुसर्या टप्प्यात ३ हजार रुपये देण्याचे ठरले. सोमवारी ३ हजार रुपयांची लाच देण्यासाठी तक्रारकर्ता गेल्यानंतर कनिष्ठ अभियंता अतुल तिडके याने त्याला काही वेळ बसवून ठेवले. त्यानंतर तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अभियंत्यास लाच घेताना रंगेहाथ अटक केली. आरोपीस मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनात सुनील राऊत, सुनील पवार व कर्मचार्यांनी केली.
लाचखोर कंत्राटी अभियंता गजाआड
By admin | Published: September 08, 2015 2:25 AM