डोणगाव (जि. बुलडाणा): मारहाण प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर न करता परस्पर जामीन देण्यासाठी आरोपींकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पोलीस ठाण्यातच अटक केल्याची घटना ११ एप्रिल रोजी घडली. मेहकर तालुक्यातील विश्वी येथील तक्रारकर्ता व त्यांच्या वडिलाविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्हय़ात अटक करून न्यायालयात न पाठविता पोलीस स्टेशनला जमानत देण्यासाठी पोहेकाँ संजय तात्याराव मुळे याने ५ हजार रुपये लाच मागितली होती. यासंदर्भात त्यांनी १0 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाकडे तक्रार दिली. लाचलुचपत विभागाच्या चमूने मंगळवारी सापळा रचून पो.ना. दीपानंद पानगोळे यास पाच हजार रुपये लाच स्वीकारताना पकडले. यासंदर्भात पोहेकाँ संजय तात्याराव मुळे व दीपानंद शेषराव पानगोळे यांच्याविरुद्ध कलम ७, १२, १३ (१) (ड) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचार्यांना अटक करण्यात आली आहे.
लाचखोर पोलीसांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2016 1:13 AM