अकोला, दि. १५- सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पृष्ठभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशातून महापालिकेच्यावतीने शहरात बॅरिके डिंगची व्यवस्था केली जाते. यंदा मात्र मनपा व कंत्राटदाराच्या आपसातील घोळामुळे बॅरिकेडिंगला विलंब झाला. संबंधित कंत्राटदाराने हा घोळ जाणीवपूर्वक निर्माण केल्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनासह मनपाने घेतली असून कंत्राटदाराचा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गणेश उत्सवाच्या काळात शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशातून गणेश विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड लावल्या जातात. ही व्यवस्था पोलिसांच्या सूचनेनुसार मनपाकडून पूर्ण केली जाते. मनपाचे तत्कालीन आयुक्त दौलतखान पठाण यांच्या कालावधीत या व्यवस्थेची जबाबदारी मनपाकडे घेण्यात आली होती. तेव्हापासून गणेश विसर्जन मार्गावर ठरावीक ठिकाणी बॅरिकेड लावण्याचा कंत्राट श्री नाना उजवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर यांना दिला जातो. यंदा प्रथमच बॅरिकेड लावण्याच्या कामाची निविदा प्रकाशित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला. ९ सप्टेंबर रोजी एका स्थानिक वृत्तपत्रात निविदा प्रकाशित केली. निविदा अर्ज कोणी सादर न केल्यामुळे तसेच सदर कामाचे देयक नगदी स्वरूपाचे असल्याने बांधकाम विभागातील कर्मचार्यांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री उजवणे यांची भेट घेतली. दुसर्या दिवशी विलास जोशी नावाच्या कंत्राटदाराने काम करण्याची तयारी दर्शवल्याने मनपाने जोशी यांना बॅरिकेड लावण्याचा कंत्राट दिला. जोशी यांनी १४ सप्टेंबरच्या सायंकाळी अर्थातच गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला बॅरिकेडिंगची कामे पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु जोशी यांच्याकडील मजुरांना चढय़ा दराने मजुरी देऊन दुसरीकडे नेण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे १४ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंतही कामाला सुरुवात न झाल्याचे पाहून जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व मनपाची धावपळ सुरू झाली.
मनपा-कंत्राटदाराच्या घोळात बॅरिकेडिंगला विलंब
By admin | Published: September 16, 2016 3:11 AM