अकोला: बार्शीटाकळी नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी शनिवारी दुपारी जिल्हा काँगेस कमिटीच्यावतीने बार्शीटाकळीतील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगराध्यक्षपदासाठी आठ जणांनी तर नगरसेवक पदासाठी १७ वार्डांमधून ४५ जणांनी मुलाखती दिल्या. स्वराज्य भवनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.बार्शीटाकळी नगर पंचायतीची निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. त्यामध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने बार्शीटाकळी नगराध्यक्ष पदासाठी आठ इच्छुक उमेदवारांनी तसेच १७ वार्डांमधून नगरसेवक पदासाठी ४५ च्यावर उमेदवारांनी मुलाखती देत, उमेदवारासाठी दावा दाखल केला. यावेळी इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन केले. चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, माजी मंत्री अजहर हुसैन, माजी आमदार नातिकोद्दीन खतिब, सुनील धाबेकर, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव विखे पाटील, माजी महापौर मदन भरगड, माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे, मनपा विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण, काँग्रेसचे जिल्हा महासचिव हेमंत देशमुख, अविनाश देशमुख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. महेश गणगणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष साधना गावंडे, अब्दुल जब्बार, महेंद्र गवई आदींच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. (प्रतिनिधी)