लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : येथील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचातयचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने रखडली होती. याविषयी गावातील नजमअली खान नसीमअली खान यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने रखडलेली पाणीपुरवठा योजना एका वर्षात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे. बार्शीटाकळी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सन २०१० ला ग्रामपंचायतने मासिक सभेत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत काम मंजूर व्हावे, याकरिता ठराव मंजूर केला होता, तसेच पहिल्या आमसभेमध्ये याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. या गावाकरिता १२ कोटी ९० लाख रुपयांची योजना मंजूर झाली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने गावात सर्वेक्षण जागासुद्धा निश्चित केली होती. यापैकी नऊ कोटी रुपये आरक्षित ठेवले होते. शासनाने १ आॅगस्ट २०१५ रोजी बार्शीटाकळी ग्रामपंचायत रद्द करून नगरपंचायत जाहीर केली होती. ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्याने पाणीपुरवठा योजना रखडली होती. हिवाळी अधिवेशनात ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणली होती. त्यांनी पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत बार्शीटाकळी ग्रामपंचायतच कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून बार्शीटाकळीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर केले होते, त्यामुळे मंजूर होऊनही योजनेचे काम बंद पडले आहे. याविषयी नजमअली खान नसीमअली खान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने एक वर्षाच्या आत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.कायमस्वरूपी पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन उपसरपंच सविता शंकरराव वरगट, जि.प. सदस्य रेहानाबी आलमगीर खान, बार्शीटाकळी पंचायत समितीचे उपसभापती सैयद फारुख सैयद मुश्ताक, डॉ.मुदस्सीर खान, हाजी सैयद नकीम, सै.इमदाद गाजीखान आदी प्रयत्न करीत आहेत. न्यायालयाच्या निकालाचे आपण स्वागत करतो, तसेच पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित सुरू होतील, अशी अपेक्षा आहे, असे पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष शंकरराव वरगट यांनी सांगितले.
बार्शीटाकळीची पाणी समस्या सुटणार!
By admin | Published: July 03, 2017 1:31 AM