लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी बारुला विभागातील ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारीत गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त १0 ऑगस्ट रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय.अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना खांबोराजवळील उन्नई बंधार्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, नदी-नाल्याच्या पात्रातील ‘झिर्या’च्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात यावे व गावांना पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करीत बारुला विभागातल्या बारा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना देण्यात आले. यावेळी बारुला विभाग कृती समितीचे अध्यक्ष दिलीप मोहोड, आपातापा येथील सरपंच लक्ष्मी घुसे, अर्चना तालोट, वंदना तराळे, अजाबराव भोपसे, जनार्दन भातकुले, नंदकिशोर ढगे, पद्मा डाबेराव, अर्जुन चिपडे, दत्ता ढगे, दीपक मोहोड, बळीराम ढगे यांच्यासह बारुला विभागातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
जि. प. सभेचे वेधले लक्ष; अध्यक्षांना दिले निवेदन!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने निर्माण झालेली जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाल्याच्या मुद्यावर बारुला विभागातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत धाव घेत सर्वसाधारण सभेचे लक्ष वेधले. तसेच ६0 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान धरणातून पाणी सोडण्यात यावे व पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांना देण्यात आले.