शेतकऱ्याचे यश: दोन एकर शेतात ४३२ क्विंटल मिरची
दादाराव गायकवाड, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ८ - अवघ्या दोन एकर क्षेत्रात पाण्याचा काटकसरीने वापर करून आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत तीन महिन्यांत ४३२ क्विंटल मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची कामगिरी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्याने केली आहे. समर्थ केशव भगत असे या शेतकऱ्याचे नाव असून, तालुक्यातील मोहगव्हाण-चांभई शिवारात त्यांचे शेत आहे.समर्थ भगत यांच्याकडे सहा एकर शेती आहे. या शेतीत ते नेहमी विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन घेतात. पिकांचे वाण, पिकाचा प्रकार याची पारख करण्यासह विषम वातावरणातही नुकसान टाळण्याचे कसब त्यांना चांगले अवगत आहे. त्यामुळेच तालुक्यातील नव्हे, तर जिल्ह्यातील काही निवडक यशस्वी शेतकऱ्यांत त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. समर्थ भगत हे प्रामुख्याने खरीपातील तूर, सोयाबीन, तसच रब्बी हंगमातील गहू, हरभरा या पिकांसह फुलकोबी, ढोबळी मिरची, सिमला मिरची, साधी मिरची, कांदा, कोथींबीर, मेथी, वांगी आदि भाजीपाला पिकांचे उत्पादन आलटून पालटून घेत असतात. यंदा त्यांनी आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आपल्या एकूण शेतापैकी ३५ गुंठे क्षेत्रात साधी मिरची लावली, तर सव्वा एकर क्षेत्रात ढोबळी आणि सिमला मिरचीची लागवड केली. यात आजवर साध्या मिरचीतून त्यांना एकशे साठ क्ंिवटल, तर ढोबळी आणि सिमला मिरचीतून २७२ क्विंटलचे उत्पादन झाले. साध्या मिरचीला सरासरी १५ रुपये प्रति किलोचा भाव मिळाल्याने त्यांना एकशे साठ क्विंटलमधून दोन लाख ४० हजार, तर ढोबळी आणि सिमला मिरचीला सरासरी १८ रुपये प्रति किलो भाव मिळाल्याने २७२ क्विंटलमधून ४ लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न झाले, असे दोन्ही प्रकारच्या मिरचीतून अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधित त्यांना ७ लाख २९ हजार रुपयांचे विक्रमी उत्पादन झाले. मिरचीची लागवड करण्यासाठी मल्चिंग पद्धतीचा अवलंब केला. खतांचे, पाण्याचे प्रभावी नियोजन आणि योग्य काळजीमुळेच त्यांना एवढे विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले. या मिरची पिकातून त्यांना आणखी पावणे दोन क्विंटलचे उत्पादन होण्याचा विश्वास आहे.