अकोला : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेल्या रणधुमाळीत राजकारण्यांनी कंबर कसली असून, संभाव्य उमेदवारांसह विविध राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र मंगळवारपासून सुरू झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी ९५ उमेदवारांचे १०१ आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांसाठी १६१ उमेदवारांचे १६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याने, गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत रणधुमाळीला ‘ब्रेक’ लागला होता. आता पुन्हा रणधुमाळीला वेग आला आहे. त्यामध्ये उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादी प्रमुख पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले असून, राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीसाठी कंबर कसली आहे.
पक्षनिहाय अशी आहे उमेदवारांची संख्या !
पक्ष जि.प. पं.स.
वंचित बहुजन आघाडी १४ २८
शिवसेना ०९ १५
राष्ट्रवादी काँग्रेस ०५ ०७
भाजप १४ २७
काँग्रेस १२ २३
.............................................................................
‘वंचित’ने घेतली उमेदवारांची बैठक!
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांसह पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवार १४ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. निवडणुकीतील पक्षाच्या मोर्चेबांधणीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
........................................
भाजपची गुरुवारी; काँग्रेसची शुक्रवारी बैठक!
भाजपची जिल्हा बैठक गुरुवार, १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे उमेदवार उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी दिली. तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व पक्षाच्या उमेदवारांची बैठक शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी सांगितले.