अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी, ९ जुलै रोजी दिला. त्यामुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला असून, उमेदवारांनी सुरू केलेल्या तयारीवर विरजण पडले आहे. यासोबतच पोटनिवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आलेल्या मोर्चेबांधणीलाही आता ‘ब्रेक’ लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांकडून संबंधित जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू करीत, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला असतानाच, कोरोना विषाणूची दुसरी लाट पूर्णपणे संपुष्टात आली नसल्याने आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांचा हिरमोड झाला असून, त्यांनी सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारीवर विरजण पडले आहे. यासोबतच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या मोर्चेंबांधणीलाही ‘ब्रेक’ लागणार असून, जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या पोटनिवडणुकांच्या टप्पानिहाय अंमलबजावणीची प्रक्रिया देखील थांबणार आहे.
जि. प. १४ गट , पं. स.च्या २८ गणांसाठी
उमेदवारी दाखल केलेले असे आहेत उमेदवार!
तालुका जि. प. गट उमेदवार पं. स. गण उमेदवार
तेल्हारा ३ १९ ४ २१
अकोट २ १५ ४ २०
मूर्तिजापूर २ १० ४ २०
अकोला ३ २६ ५ २८
बाळापूर २ १२ ४ २८
बार्शिटाकळी १ ०८ ४ २७
पातूर १ ०६ ३ २३
............................................................................................................
एकूण १४ ९६ २८ १६७
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या २८ जागांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
- संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.