मुंबई - शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत जाऊन संसार थाटला आहे. जवळपास ५० आमदारांना सोबत घेत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. सत्तासंघर्षाच्या या धावपळीत महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या आमदारांपैकी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे पळून आले, त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचंही स्पष्ट करत एकनाथ शिंदेवर टीका केली होती. आता, नितीन देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जबरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना आमदार देशमुख यांनी ही घणाघाती टीका केली.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. फडतूस गृहमंत्री असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाणे प्रकरणातील मारहाणीवरुन लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, भाजप नेते ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरेंवर शाब्दीकरित्त्या तुटून पडले. त्यावेळी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट इशाराच दिला होता. उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आम्हीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही सोडणार नाही. आज तुम्हाला शेवटची वॉर्निंग देत आहे. यापुढे फडणवीसांबाबत काही बोललात तर तुम्हाला घराबाहेरही पडू देणार नाही, असा थेट इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यावर, आता आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्त्युतर दिलंय.
''बावनकुळे यांची औकात काय आहे? त्यांनी मातोश्रीच्या बाहेर जाऊन उद्धव ठाकरे यांना रोखून दाखवावे. खरे दूध न पिलेला माणूस म्हणजे बावनकुळे आहे. त्यांच्याकडे पाहिले तर ते एक मतिमंद असलेला माणूस दिसतात. मतिमंद माणसाने अशी भाषा बोलू नये.'', अशा शब्दात आमदार देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली.
काय म्हणाले होते बावनकुळे
"उद्धव ठाकरे यांनी आज फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यानं मर्यादा ओलांडली आहे. पण अजूनही आम्ही त्यांना आज शेवटची संधी देत आहोत. यापुढे जर आमच्या नेत्यांबाबत अशी वक्तव्य करणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही. तुमचं घराबाहेर पडणं मुश्कील होईल. ज्या फडणवीसांना तुम्हाला भावासारखं प्रेम दिलं त्यांच्याबद्दल तुम्ही अशी विधानं कराल असं कधीच वाटलं नव्हतं", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.