अकोला : पातूर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विनोद शिंदे व अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन देशमुख यांच्यात बुधवारी सिंचन विहिरीच्या मंजुरीच्या मुद्यावरून बाचाबाची झाली. पातूर पंचायत समितीच्या कार्यालयात सायंकाळी साडेचार वाजताचे दरम्यान झालेल्या या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पातूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या चोंढी सर्कलचे सदस्य असलेले नितीन देशमुख हे सस्ती येथील सिंचन विहिरींच्या लाभार्थींना अनुदान मंजुरीच्या मागणीसाठी पंचायत समितीत आले होते. यावेळी त्यांनी कृषी अधिकारी तथा सध्या विस्तार अधिकारी पदाचा प्रभार असलेले शिंदे यांच्या कक्षात जाऊन आपल्या मागणीसंदर्भात चर्चा केली. तथापि, विधानसभा शिक्षक आमदार निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे सदर मंजुरी देता येणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. नितीन देशमुख मात्र आपल्या मागणीवर अडून बसले होते. या कारणावरून दोघांमध्ये प्रचंड शाब्दीक खडाजंगी उडाली व दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले. उपस्थितांनी आवराआवर केल्यामुळे पुढील प्रसंग टळला. यानंतर दोघांनीही आपल्या समर्थकांसह पातूर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गट पोलिस ठाण्यात उपस्थित होते. सदर वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.
बीडीओ, जि.प. सदस्यात बाचाबाची
By admin | Published: May 28, 2014 9:49 PM