अकोला: सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी जुने एटीएम कार्ड कालबाह्य ठरवून त्याऐवजी नवीन चीप बेस एटीएम कार्ड ग्राहकांना बंधनकारक केले आहे. नेमकी हीच बाब चोरट्यांनी हेरली असून, अनेक नागरिकांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांना चीप बेस एटीएमविषयी सांगितल्या जाते आहे आणि त्यांच्याकडून जुन्या, नवीन एटीएम कार्डवरील सोळा डिजिट क्रमांक व पीन कोड मागून आॅनलाइन आर्थिक फसवणूक केल्या जात आहे. सायबर पोलीस ठाण्यात बँक खात्यातून परस्पर रक्कम काढल्याच्या १२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांनी जुने एटीएम कार्ड बदलवून नवीन चीप बेस एटीएम कार्ड बँक खातेदारांना बंधनकारक केले असल्यामुळे ३१ डिसेंबर २0१८ नंतर जुने एटीएम कार्ड पूर्णपणे बंद होणार आहेत. त्यामुळे सध्या नवीन चीप बेस एटीएम कार्डसाठी बँकांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत. जुने एटीएम कार्ड बंद होणार असल्यामुळे हजारो खातेदार नवीन एटीएम कार्डसाठी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. नेमकी हीच बाब चोरट्यांनी हेरली असून, बँक खातेदारांना मोबाइल फोन करून बँकेतून अधिकारी बोलत असल्याची भुलथाप देऊन तुमचे जुने एटीएम कार्ड आता रद्द होणार आहे. नवीन चीप बेस एटीएम कार्ड घ्यावे लागणार आहे. त्यासाठी तुमच्या एटीएमचा १६ अंकी डिजिट नंबर आणि कोड सांगा, अशी विचारणा करीत आहेत. बँकांनी नवीन चीप बेस एटीएम कार्ड अनिवार्य केल्यामुळे नागरिकही त्या चोरट्यांच्यावर बोलण्यावर विश्वास देऊन गोपनीय माहिती देऊन टाकतात. काही वेळात त्यांच्या खात्यातील रक्कम काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर येऊन धडकतो आणि आपली फसवणूक झाल्याची जाणीव त्यांना होते. अकोला शहरात काही खातेदारांसोबत असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)शिक्षिकेची फसवणूक होता-होता टळली!जिल्हा परिषदेच्या एका शिक्षिकेला बँकेतून बोलत असल्याचा मोबाइल फोन आला आणि संबंधित चोरट्याने भुलथापा देऊन माहिती मागितली. शिक्षिका ही माहिती सांगण्याच्या तयारीत असतानाच, काही सहकाºयांनी त्यांना थांबविले. त्या शिक्षक सहकाºयांनी शिक्षिकेला बँकेतून कधीच असा फोन येत नाही. तुमची फसवणूक करण्यासाठी हा कॉल होता. या शिक्षिकेला पुन्हा फोन आल्यावर संबंधित चोरटा पुन्हा फोनवर माहिती विचारला लागल्यावर, त्या शिक्षकांनी फोन घेत, त्याला खडसावले आणि पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यावर त्याने लगेच फोन कट केला.
ओटीपी नंबर कुणालाही देऊ नका!आॅनलाइन खरेदी करताना रजिस्टर केलेल्या नंबरवर ओटीपी नंबर येतो. हा नंबर ग्राहकाने कोणालाही कधीच सांगू नये. हा नंबर घेऊन अनेक जण आॅनलाइन पैसे काढण्याची शक्यता आहे.एटीएम वापरताना काळजी घ्याबँक कधीही एटीएमसंबंधी माहिती फोनवरून विचारत नाही. आजूबाजूला कोणी व्यक्ती नाही ना, याची खबरदारी घ्यावी. आपले एटीएम दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये किंवा त्याचा क्रमांक व पासवर्ड कोणाला सांगू नये.
डिसेंबरमध्ये केवायसी फॉर्मच्या दोन, ओटीपी नंबर मागितल्याच्या दहा तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. बँकेतून कधीही एटीएम, ओटीपी क्रमांक मागितल्या जात नाही. नागरिकांसोबत असा प्रकार झाल्यास, तातडीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा. एका तासात तक्रार केल्यास तक्रारकर्त्यांची रक्कम परत मिळू शकते.- सीमा दाताळकर, सहायक पोलीस निरीक्षकसायबर पोलीस स्टेशन