अकोला: २0१८ या सरत्या वर्षाला निरोप देऊन २0१९ नववर्षात आपण पाऊल टाकणार आहोत. नववर्षाच्या स्वागतापेक्षा नववर्षाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचा उत्साह प्रत्येकाला आहे. तरुणाईला आतापासूनच ‘थर्टी फर्स्ट’ची झिंग चढली आहे. नववर्षात नवी उमेद, नव्या संकल्पाची अपेक्षा आहे; परंतु ‘थर्टी फर्स्ट’चा आनंद साजरा करताना लाखमोलाचा जीवसुद्धा सांभाळणे गरजेचे आहे. त्यामुळे दारूच्या उन्मादाचे भान राखत सावधतेने नववर्षाचे सेलिब्रेशन व्हावे.नववर्ष म्हटले, की जल्लोष आला. डीजेच्या तालावर थिरकणे, मद्य प्राशन करणे, भरधाव वाहन चालविण्याचे प्रकार सर्रास घडतात. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील आणि शहरालगतची अनेक ढाबे, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. अनेक तरुण-तरुणींनी हॉटेल्स, ढाबे, जवळपासच्या शेतामध्ये जाऊन ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन प्लॅन’ आखला आहे. जल्लोष करताना कशाचीही कमतरता पडू नये, यासाठी मद्याचा पुरेसा साठा, खाण्या-पिण्याची सोय अनेकांनी ठेवली आहे. अनेकांनी शेगावसह इतर धार्मिक स्थळी जाऊन नववर्षाची सुरुवात करण्याचा संकल्प केला आहे. धांगडधिंगा घालण्यापेक्षा ईश्वराच्या नामस्मरणाने नववर्षाचे स्वागत करण्याचे अनेकांनी ठरविले आहे. या सात्त्विक वृत्तीपेक्षा मद्यधुंद अवस्थेत, नाचगाणं करीत सेलिब्रेशन करण्यावर तरुणाईचा भर अधिक आहे. मद्य प्राशनाचा, गोंगाटाचा इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी तरुणांनी घेणे गरजेचे आहे. ‘थर्टी फस्ट’च्या सेलिब्रेशनला गालबोट लागणार नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री अपघात, हत्या आणि हाणामारीसारख्या घटना घडतात. त्यामुळे पोलिसांनी दक्ष राहत कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
ही सावधगिरी बाळगा!मद्यपान करून दुचाकी, चारचाकी चालवू नये, अति मद्यपानामुळे वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ३१ डिसेंबर रोजी पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून ब्रीथ अनलायझरने वाहन चालकांची तपासणी करण्यात येणार आहे, तसेच हॉटेल, पार्टीच्या ठिकाणांवरसुद्धा पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत.पालकांनो, मुलांवर नियंत्रण ठेवा!३१ डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन केल्यामुळे अपघात, वाद, हाणामारीसारख्या घटना दरवर्षी घडतात. नववर्षाचे सेलिब्रेशन व्हावे; परंतु त्याला गालबोट लागू नये, यासाठी पालकांनी मुलांना वेळीच आवर घालावा.दूध पिऊन नववर्षाचे स्वागतयेथील गायत्री परिवाराच्यावतीने तरुणांना आवाहन केले आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या दिवशी मद्य प्राशन ‘सेलिब्रेशन’ करण्याऐवजी दूध पिऊन स्वागत करा, त्यासाठी गायत्री परिवारातर्फे कौलखेड कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शेकडो भक्तांची शेगाव पायदळ वारीनववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी, धांगडधिंगा घालण्यापेक्षा भक्तिभावाने नववर्षाची सुरुवात करावी, या दृष्टिकोनातून शेकडो गजानन भक्त ३१ डिसेंबर रोजी पायदळ वारीने शेगावला जाणार आहेत.