अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नातून आणि अकोलेकरांच्या श्रमदानातून मोर्णा नदी स्वच्छ केली जात आहे, परंतु काही खोडसाळ लोक अजुनही मोर्णामध्ये निर्माल्य व कचरा आणून टाकत आहे. अशा लोकांवर प्रतिबंध घालण्यासाठी आता मोर्णामध्ये कचरा टाकणाऱ्यांना रंगेहात पकडण्यात येईल. त्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी त्या व्यक्तीचा सत्कार करतील. तसेच शिक्षा म्हणून ती व्यक्ती आणि तिच्या कुंटुबीयांकडून दिवसभर मोर्णाची स्वछता करून घेतली जाईल, त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांनो सावधान..!
अकोल्याची वैभव असणारी आपली मोर्णा नदी काही दिवसांपूर्वी जलकुंभी आणि कचऱ्याने तुडुंब भरलेली होती. घाणीमुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते. नदीचे डबक्यात रूपांतर झाले होते. या सर्वांतून मोर्णाला मुक्त करण्यासाठी व स्वच्छ मोर्णा करण्याकरिता स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून स्वच्छ मोर्णा मोहीम हाती घेतली. दि. १३ जानेवारीपासून सुरु झालेली ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. नुकतेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन कि बात' या कार्यक्रमातून स्वच्छ मोर्णा मोहीमेची दखल घेतल्याने अकोलेकरांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वच्छ मोर्णा मोहीमेमुळे मोर्णा आता झपाट्याने स्वच्छ होत आहे, परंतु काही खोडसाळ लोकं अजूनही मोर्णामध्ये निर्माल्य, कचरा आणून टाकत आहेत. अकोलेकरांसाठी ही बाब अशोभनीय असून यापुढे आता कोणी मोर्णा अस्वच्छ करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही. कचरा किंवा निर्माल्य टाकणाऱ्यास रंगेहात पकडण्यात येणार आहे. त्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी त्या व्यक्तीचा सत्कार करतील. तसेच शिक्षा म्हणून ती व्यक्ती आणि तिच्या कुंटुबीयांकडून दिवसभर मोर्णाची स्वछता करून घेतली जाईल, त्यामुळे कचरा टाकणाऱ्यानो सावधान..! आपली मोर्णा घाण करू नका..!, असा इशारा मोर्णा स्वच्छ मिशनद्वारे देण्यात आला आहे.