अकोला : असंघटित नोंदणीकृत मजुरांच्या ऑनलाइन नोंदणी व नूतनीकरणाच्या प्रस्तावांना तातडीने स्वीकृती देण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी अकोला बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने असंघटित मजुरांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने अद्ययावत संगणकीकृतप्रणालीचा अवलंब करण्यात येत असल्याने, असंघटित मजुरांनी नोंदणी व नूतनीकरणाचे ऑनलाइन प्रस्ताव सादर केले. परंतु गत दहा महिन्यांपासून या प्रस्तावांची पडताळणी व स्वीकृतीचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे नोंदणीकृत मजुरांच्या ऑनलाइन नोंदणी व नूतनीकरणाच्या प्रस्तावांना तातडीने स्वीकृती देण्यात यावी, नोंदणीकृत मजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रतिमहा पाच हजार रुपये निवृृत्तिवेतन देण्यात यावे, इएमआय आरोग्यदायी योजनेचा लाभ देण्यात यावा, घरकुलासाठी पाच लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी अकोला बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.