संजय खांडेकर अकोला, दि. २६- आभासी चलन असलेल्या बीटक्वाइनच्या सट्टाबाजाराला मिळालेल्या यशानंतर नवीन-नवीन विदेशी क्वाइन आता चलनात येत आहे. बीटक्वाइनला मिळालेला मोठा प्रतिसाद व बाजारपेठेत वधारलेले दर लक्षात घेता क्राप्टो आणि एलएफसी नावाच्या नवीन विदेशी क्वाइनची अलीकडे युवा वर्गात धूम करीत आहे. अकोल्यासारख्या ठिकाणी आठशे युवकांच्या नेटवर्कची मोठी टीम कार्यरत झाली आहे, त्यामुळे बिटक्वाइनसारखी दरवाढ क्राप्टो आणि एलएफसीची झाली. आभासी मुद्रा घेणारे शेकडो युवक रातोरात कोट्यधीश होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.युनायटेड स्टेटमध्ये डिजिटल चलन, अभासी मुद्रा म्हणून बिटक्वाइन सट्टाबाजार जगभरात ओळखल्या जात आहे. ऑनलाइन सट्टाबाजारा तील बीटक्वाइनमुळे एका क्वाइनचे दर आता ८९ हजार झाले. जगभरातून चौफेर मागणी वाढत असल्याने बीटक्वाइनचे भाव वधारले असून त्या भोवती अनेक देशांची अर्थव्यवस्था फिरू लागली आहे. त्यामुळे या आभासी मुद्रा चलनात आता चीन आणि इतर देशांनी उडी घेऊन क्राप्टो आणि एलएफसी नावाचे वेब क्वाइन बाजारपेठेत आणले आहे. जगभरातील ५५ देशांमध्ये या आभासी चलनास लवकरच मान्यता मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. अनेक कंपन्यांसोबतचे आर्थिक व्यवहार या क्वाइनच्या आंतरराष्ट्रीय चलनामुळे होणार आहे, असेही म्हटले जाते. सुरुवातीला नोंदणी करताच, विनामूल्य स्वरूपाचे तीन हजार क्वाइन दिले जात असल्याने सर्वत्र नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी झाली आहे. पॅनकार्ड किंवा पासपोर्ट क्रमांकावर ही नोंदणी होत आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यत हे जाळे मोठय़ा प्रमाणात विस्तारले गेले आहेत. कोट्यधीश होण्याच्या आमिषाला बळी पडून देशभरातील युवकांची फळी आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारात ओढवल्या गेली आहे. अकोल्यासारख्या ठिकाणी या दोन्ही कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये शेकडो युवक जोडले गेले आहे. बीटक्वाइनवर दररोज कोट्यवधीची उलाढाल होत असल्याने भविष्यात क्राप्टो आणि एलएफसीचे क्वाइनदेखील असेच महागडे होणार असल्याचे बोलले जात आहे. नोंदणीसाठी रक्कम जात नसली तरी अमूल्य आयडीचा कुठे दुरुपयोग तर होणार नाही ना, याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे.
बीटक्वाइनपाठोपाठ विदेशी चलनाची धूम
By admin | Published: March 27, 2017 2:57 AM