अकोला : म्हातोडी येथील आॅटो चालकास विनाकारण टॉवर चौकामध्ये काठीने बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी फराज याची तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई न करता बदली देऊन कठोर कारवाई टाळल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मारण्याचे अधिकार नसताना या कर्मचाऱ्याने भर रस्त्यावर ही मारहाण केल्याचे सीसी कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतरही पोलिसांनी आॅटो चालकाविरुद्धच गुन्हा दाखल केला, हे विशेष.म्हातोडी येथील गजानन निरंजन इदोकार आॅटो घेऊन टॉवर चौकातून जात असताना वाहतूक कर्मचारी फराज याने काठीने बेदम मारहाण सुरू केली. आॅटोमध्ये प्रवासी असल्याचे भानही विसरलेल्या पोलिसाने आॅटो चालकास काठीने मारहाण केल्याने आॅटो चालक चालत्या आॅटोतून खाली कोसळला. त्यानंतरही पोलीस कर्मचारी फराजने त्याला मारहाण सुरूच ठेवली. मारहाणीत आॅटोचालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली; मात्र रामदास पेठ पोलिसांनी आॅटो चालकाची तक्रार न घेता पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून आॅटो चालकाविरुद्धच गुन्हा दाखल केला. दरम्यान, या मारहाणी प्रकरणाचे सीसी टीव्ही फुटेज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासले. त्यानंतर फराज याची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी आहे.
मारहाण करणारा पोलीस नियंत्रण कक्षात
By admin | Published: April 17, 2017 1:57 AM