अकाेला
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी अभ्यासासाठीच्या प्रवेशासाठीच्या आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली असून, बारावीत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय अनिवार्य असणे रद्द केले. या वर्षापासून, बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र न शिकणारे विद्यार्थीही अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या निर्णयाबाबत शैक्षणिक क्षेत्रातच पडसाद उमटत आहेत.
एआयसीटीईच्या सुधारित नियमांनुसार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये किमान ४५ टक्के गुणांची आवश्यकता असेल आणि १४ विषयांच्या यादीतील तीन विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने हा निर्णय नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने घेतल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणात अकॅडमिक क्रेडिट बँकची (एबीसी) संकल्पना आहे. विद्यार्थी त्याच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबर इतर आवडीच्या विषयात शिकायचे असल्यास, ते तो विषय शिकून त्याबद्दलचे प्राप्त क्रेडिटस् त्याच्या एबीसीमध्ये जमा करू शकतो. उदाहरणार्थ, इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी संगीत विषयात आवड असल्यास त्याविषयीचा अभ्यासक्रम पूर्ण करून, त्यात प्राप्त क्रेडिटस् स्वतःच्या पदवीत मिळवू शकतो. नवीन शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय शिक्षणाला पण प्रोत्साहन दिले आहे.
आता इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच हीच संकल्पना लागू करण्याचा मानस येथे दिसतोय असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बाॅक्स
अभियांत्रिकीचा पाया ठिसूळ करणे अयोग्य
गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय अभियांत्रिकी शाखेचा पाया आहेत. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आता तर मेडिकल सायन्स व इतर लाईफ सायन्सेसमध्ये पण गणित, रसायनशास्त्र यासारख्या विषयांचे ज्ञान असणे उपयोगीच ठरते. त्यामुळे इंजिनिअरिंगचा पाया मजबूत होण्यासाठीचे विषयच प्रवेशासाठी नसणे हे निश्चितपणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तयार होणाऱ्या इंजिनिअर्सचा पाया निश्चितपणे ठिसूळ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काेट
आताच उद्योगजगतांत लागणारे कौशल्य विद्यापीठातून पदवीप्राप्त इंजिनिअर्समध्ये नसल्याची खंत व्यक्त होताना दिसते आणि आता नवीन बदलाने इंजिनिअर्सचा पायाच कमकुवत राहू शकतो. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणात, उच्च शिक्षणात जे आंतरशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे, ते पदवी प्रवेशानंतर, पदवी प्रवेशापूर्वी नाही.
डाॅ. संजय खडक्कार
गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांचे ज्ञान इंजिनिअरिंग शिकण्यासाठी आवश्यक आहे, ते ज्ञान, विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर, ब्रीज कोर्स व्दारे शिकतील, असे एआयसीटीईने म्हटले आहे त्यामुळे विद्याथ्याना हे दाेन्ही विषय शिकावेच लागतील
प्राचार्य एस. के. देशमुख शिवाजी महाविद्यालय